सावधान! लोहगड किल्ल्याच्या पायथ्यावरील डोंगराला भेगा..

1 min read

भूस्खलनाची भीती, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..

Impact of heavy rains on Lohagad fort

पवनानगर: मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड गावाजवळील डोंगराला भेगा पडल्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे तेथील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

बुधवारी सकाळी डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याने डोंगराच्या पायथ्याशी जमिनीला भेगा पडल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली.

लोहगड पायथ्याशी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोंगराची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, तलाठी शरद गाडे, राजू शेळके, गणेश धानिवले, पोलीस पाटील सचिन भोर्डे, सरपंच सोनाली बैंकर, उपसरपंच ज्योती धानिवले आणि विठ्ठल पाठारे उपस्थित होते.

मागील आठवड्यात अती मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आणि रस्त्यांना तडे गेले आहेत. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. लोहगड गावाच्या परिसरात १९८९ मध्ये भूस्खलन होऊन दोन ते तीन घरे आणि जनावरे गाडली गेली होती, तसेच २००६ मध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन धालेवाडी आणि आजूबाजूच्या गावातील भात शेती नष्ट झाली होती.

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड गावाची लोकसंख्या सुमारे ४५० ते ५०० आहे, आणि धालेवाडीची लोकसंख्या ३०० ते ३५० आहे. या भागातील डोंगरालगत दाट लोकवस्ती आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे काही रस्ते वाहून गेले आहेत आणि डोंगराला भेगा पडल्या आहेत.

ग्रामस्थ, राजू शेळके : “माझ्या गायीचा गोठा पाहण्यासाठी गेलो असता, जमिनीला भेगा पडल्याचे दिसले. मी तातडीने सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली आहे.”

प्रांताधिकारी, सुरेंद्र नवले: “लोहगड डोंगराला पडलेल्या भेगांची पाहणी केली असून वरिष्ठ कार्यालयात याबाबत कळवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे

तहसीलदार विक्रम देशमुख : “मागील आठवड्यात अती मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग ठिसूळ झाला आहे. गावातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही वरिष्ठ कार्यालयात याबाबत कळवले आहे आणि पुढील कार्यवाही केली जाणार आहे.”

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours