तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा”: नितीन गडकरी..
तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील कोंडी लवकरच सुटणार
तळेगाव दाभाडे: तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रविवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाला प्राधान्य देत लवकरच गती दिली जाईल, असा विश्वास दिला आहे.
या भेटी दरम्यान, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमीर प्रभावळकर, आणि सदस्य संजय चव्हाण, गणेश बोरुडे यांनीही सहभाग घेतला. त्यांनी गडकरी यांना मार्गावरील अपघात, वाहतूक कोंडी आणि रखडलेल्या कामाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
महामार्ग कृती समितीला मिळाले नितीन गडकरी यांचे आश्वासन
कृती समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रस्तावित एनएच 548D सहा पदरी उन्नत महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कामाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच तात्पुरत्या उपाययोजना म्हणून अस्तित्वातील 54 किलोमीटर रस्त्याचे अतिक्रमण हटवून चौपदरीकरण करावे, असेही निवेदन समितीकडून करण्यात आले.
गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा,” असे सांगत सदर रस्त्याच्या कामाला प्राधान्याने गती दिली जाईल, असे आश्वासन दिले.
“तुमच्या रस्त्याचे काम झाले म्हणून समजा”: नितीन गडकरी
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या संदर्भात अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना नक्कीच गती मिळेल आणि लवकरच ठोस निर्णय घेतले जातील, असे गडकरी यांनी आमदार सुनील शेळके यांना सांगितले.
+ There are no comments
Add yours