ब्रम्हा बिल्डर : विशाल अग्रवालचा आणखी एक घोटाळा! सहकारी गृहनिर्माण संस्थेची जमीन हडपल्याचा आरोप…

1 min read
  • पुणे शहरातील दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या साडेचार एकर जमिनीवर बिल्डर्सनी बेकायदेशीरपणे इमारती बांधल्या.
  • चार खोट्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी.
  • उपनिबंधक सहकारी संस्थांनी गैरव्यवहाराचा अहवाल दिला.तक्रारींवर कारवाई नाही झाल्याने पत्रकार परिषद.

तीन बिल्डरने मिळून ५०० ते ६०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप.

पुणे: मौजे कोंढवा (खुर्द) पुणे येथील सर्व्हे नं.१३, हिस्सा नं.१ या ठिकाणी असलेल्या दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीच्या साधारण साडेचार एकर जमिनीवर विशाल अगरवालशी संबंधित ब्रम्हा बिल्डर्स, मनीष सिंग यांची राजेश बिल्डर्स व महमूद मुसावी यांची रेडीयंट कन्स्ट्रक्शन्स यांनी संस्थेच्या चेअरमन, सेक्रेटरी यांच्याशी संगनमत करून अनधिकृतपणे इमारती/ टॉवर उभे केले व अत्यंत गंभीर बाब म्हणजे सदर इमारती / टावरमधील सदनिकांचा लाभ ‘दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या सभासदांना व नियोजित सभासदांना न देता सदर सदनिका/फ्लॅट या करोडोंच्या बाजारभावाने त्रयस्थ लोकांना बेकायदेशीरपणे विक्री करून करोडो रुपयांचा आर्थिक अपाहार केलेला आहे.

१. वर नमूद केल्याप्रमाणे ‘दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या मालकीच्या जागी केवळ बिल्डींग विकसित करून व त्यातील फ्लॅट बेकायदेशीरपणे विकून हे बिल्डर थांबले नाहीत तर त्यांनी कोंढवा (खुर्द) येथील सर्व्हे नं.१३/१ (ज्याचा ७/१२ ‘दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थे’ च्या नावावर आहे.) त्या जागेत बिल्डरांनी इतर चार सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदवल्या.


२. कोंढवा (खुर्द) पुणे येथील सर्व्हे नं.१३/१ या दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीच्या जागेत मनीष पार्क सहकारी संस्था, मनीष पार्क फेज १ आणि २, ब्रम्हा एक्झोर्बन्स, रेडीयंट आय. व्ही. या नावाने सहकारी गृहनिर्माण संस्था बेकायदेशीरपणे अस्तित्वात आणल्या गेल्या. या सर्व प्रकारात शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. याबाबत दि. २१/२/२०२३ रोजी उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर -४ यांनी त्यांच्या आदेशात व अहवालात महत्त्वाची निरीक्षणे नोंदवून सदर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले आहे.

३. वर नमूद दि. २१/२/२०२३ चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रतिनिधी मुराद पठाण (फोन नंबर – ९५४५९४०२४६) यांनी त्यांचे वकील अॅड. श्री. वनराज शिंदे यांचे मार्फत दि. २७/३/२०२३ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन, पोलिस आयक्त पुणे, सहकर आयुक्त पुणे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य इत्यादींना लेखी तक्रार करून प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा नोंदवण्यास सांगितले मात्र अद्याप त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन गुन्हा नोंद किंवा तपास करण्यात आलेला नाही.

४. मे २०२४ मधील विशाल अगरवाल यांच्याशी संबंधित पुण्यातील घटनेनंतर दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी पुन्हा एकदा स्थानिक पोलिसांकडे जाऊन त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा केला. मात्र, त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्या कारणाने आज रोजी त्यांना नाईलाजाने पत्रकार परिषद घेऊन माध्यमांपुढे हा विषय मांडावा लागत आहे.

५. ‘दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थे’ च्या सेक्रेटरी/चेअरमन यांना हाताशी धरून कागदपत्रे व न्यायिक प्रक्रिया यांमध्ये अफरा-तफर करून ब्रम्हा बिल्डर्स, राजेश बिल्डर्स व रेडियंट कन्स्ट्रक्शन्स यांनी संगनमताने ‘दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेची जमीन ही बेकायदेशीरपणे गिळंकृत करून विकसित केली व त्यातून शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. सदर गैरव्यवहाराची व्याप्ती ५०० ते ६०० कोटी असावी असा आमचा अंदाज आहे. पुणे शहरातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा सहकारी खात्यातील भूखंड घोटाळा ठरू शकतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours