वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलजीवन विस्कळीत होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड सह मावळ परिसरामध्ये तळेगाव दाभाडे, वडगाव, पवन मावळ, अंदर मावळ, नाने मावळ, लोणावळा, खंडाळा या परिसरात गेल्या २४ तासांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पावसामुळे ओढे, नाले, नद्या भरून वाहत आहेत. तालुक्यातील पाण्याच्या प्रवाहाने अनेक रस्ते, लोहगड, दुधीवरे, लोणावळा ठिकठिकाणी रस्त्यांना चिरा पडून रस्ते वाहून गेले आहेत. पुणे मुंबई दूरगती मार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचले आहे.

पवनानगर: पवना धरण ७६.०१ टक्के भरल्याने गुरुवारी दुपारी ४:०० वाजल्यापासून सांडव्यावरून चौदाशे क्युसेकने जलविद्युत निर्मितीच्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पवना धरण परिसरातील मुसळधार पावसामुळे सुरू असलेल्या धरणाच्या पाण्यात वाढ दिसून येत आहे. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास पाणी कमी जास्त प्रमाणात सोडण्यात येईल. गुरुवारी सकाळी ६:०० वाजल्यापासून सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण १७१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणात ६५ टक्के पाणी भरले आहे.

अति मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला: अंदर मावळ भागाला जोडणारा कान्हेफाटा ते टाकवे रस्त्यावर इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. खांडी सावळा अशा १५ ते २० गावांचा वाहतुकीचा संपर्क तुटला आहे. कामशेत कडून कांब्रे करंजगाव पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. नाणेमावळातील उसकान धरणाचे पाच दरवाजे उघडल्याने कुंडलिका नदी पुल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाडिवळे पुल, सांगसे, नेसावे, सिरदे अशा अनेक गावांची वाहतूक ठप्प होऊन त्या गावातील संपर्कही तुटला आहे. पवन मावळ भागातील चांदखेड बेबड ओहोळ पुलावरून पाणी गेल्याने ओव्हळे, डोणे, दिवाड पाचाने पुसाने त्या जवळील परिसरातील गावातील वाहतूक थांबली आहे. खडकवाडीचा पूल पाण्याखाली गेल्याने येलघोल, धनगव्हाण वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसाने संपर्क तुटला आहे.

मावळ परिसरातील ३७४ मिमी पाऊस: मावळ परिसरातील ३७४ मिमी पावसामुळे ठिकठिकाणी बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे शेतकरी, भाजी विक्रेते, आणि अनेक छोटे मोठे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अति मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान: मावळ तालुक्यातील मुसळधार पावसाने नाने मावळ, पवन मावळ, अंदर मावळ ठिकठिकाणी पोलीहाऊस, भात शेती पाण्यात गेली आहे. शेताची खासरे तुडुंब भरून बांध फुटून पाणी वाहत आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोणावळा: लोणावळा आणि खंडाळा येथे २४१ मिमी पाऊस झाला आहे. घाट माथ्यावरील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे लोणावळा आणि खंडाळा ठिकाण आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई पुणे एक्सप्रेसवे ला देखील बसला आहे. एक्सप्रेसवेवर पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहने बंद पडली असून वाहतुकीचा कोळंबा झाला होता. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाटमाथ्यावर पर्यटन स्थळ लोणावळा, खंडाळा येथे जोरदार पाऊस सुरू आहे. अति मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळे, गडकिल्ले, भुशी धरणावरून सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे, त्यामुळे धरण परिसरात अति मुसळधार पावसामुळे पर्यटनावर जाण्यास बंदी केली आहे.

+ There are no comments
Add yours