वडगाव मावळ पोलीसांची अपहरण प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी: अल्पवयीन मुलीला सुखरूप आणले घरी तर आरोपीला ठोकल्या बेड्या

1 min read

वडगाव मावळ, पुणे: वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत मौजे टाकवे गावातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. दिनांक १९/०७/२०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजता झालेल्या या अपहरणाच्या घटनेबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी चेहरा झाकून व विना नंबर प्लेटची मोटारसायकल वापरून आपले अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न केला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा पोलीस निरीक्षक श्री शितल कुमार डोईजड यांच्या नेतृत्वाखाली सहा तपास पथके तयार करण्यात आली. तपास पथकांनी मुंबई, लोणावळा, कामशेत, तळेगाव, देऊरोड आणि हिंजवडी या भागात शोध मोहीम राबवली. तपासादरम्यान, गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीचा वापर करून मुलीचा शोध घेण्यात आला.

गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकांनी हिंजवडी परिसरात सखोल चौकशी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून, सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, मुलीच्या सोशल मीडिया अकाउंटवरील हालचालींवर लक्ष ठेवले. या सर्व माहितीच्या आधारे, पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा मागोवा घेतला.

दहा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, तपास पथकाने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलीला सुखरूप शोधून काढले. या यशस्वी कारवाईदरम्यान, आरोपी अनिकेत उमेश शेळके (वय २० वर्षे) व ओमकार अरुण कुंभार (वय १८ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. माननीय न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या गुन्ह्यात इतर दोन अल्पवयीन मुलांना बाल न्यायालय मंडळ येथे हजर केले आहे. तसेच, अपहरणात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईत वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोहवा सचिन गायकवाड, सचिन काळे, सचिन देशमुख, विशाल जांभळे, गणपत होले, पोना अमोल तावरे, शशिकांत खोपडे, बाबुराव गावडे, पो शि सिद्धार्थ वाघमारे, संपत वायाळ, आदित्य भोगाडे, चेतन कुंभार, किरण ढोले, प्रतीक राक्षे, देविदास भांगे, चेतन दळवी, मपोशी नेहा भोर, आरती खरडे आणि टाकवे गावचे पोलीस पाटील अतुल असवले यांनी महत्वाची भूमिका बजावली.

पोलीस निरीक्षक श्री शितल कुमार डोईजड हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

पालकांनी पौगांडवस्थेतील मुलांचे मित्र व त्यांचे सोशल मीडियावरील वावर यावर बारकाईने लक्ष ठेवून मुलांना वेळोवेळी विश्वासात घेऊन मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. – माःश्री कुमार कदम, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ पोलीस ठाणे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours