राज्यात महिला सुरक्षा विषयी चिंताजनक परिस्थिती असताना: मावळ मध्ये घडला हा प्रकार:
मावळ: जांभूळ फाटा ते जांभूळ गावाच्या मार्गावर 22 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. फिर्यादी महिला आपल्या नेहमीच्या मार्गाने पायी जात असताना, स्मशानभूमीच्या शेजारी एकट्या असलेल्या या महिलेवर आरोपी दत्ता वाघमारे याने अचानक मागून येऊन हल्ला केला.
दत्ता वाघमारे याने महिलेच्या गळा दाबून तिच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने घाबरून आरडाओरडा केला असता, त्यावेळी त्या मार्गावरून दुचाकीवरून जात असलेला एक इसम तिच्या मदतीला आला. त्या इसमाच्या मदतीमुळे घाबरलेला आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
मात्र, या घटनेने येथेच थांबले नाही. आरोपीचा भाऊ गणेश वाघमारे, ज्याच्या हातात कोयता होता, तो घटनास्थळी धावून आला. त्याने फिर्यादी महिला आणि तिला मदतीला आलेल्या इसमाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर, गणेश वाघमारे याने दत्ता वाघमारे याला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केली.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी दत्ता वाघमारे आणि गणेश वाघमारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 134, 309(5), 351(2), 352 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी गणेश वाघमारे यास अटक करण्यात आली असून, पोलिस अधिकारी PSI सांगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात महिला सुरक्षा विषयी चिंता वाढली असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे. संबंधित आरोपींना लवकरात लवकर न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
+ There are no comments
Add yours